July 1, 2024 1:45 PM

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या ४ जागांसाठीच्या निवडणुकीच्या मतमोजणीला प्रारंभ

महाराष्ट्र विधान परिषदेच्या ४ मतदारसंघातल्या निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी सुरु झाली. कोकण पदवीधर, मुंबई पदवीधर आणि मुंबई शिक्षक मतदारसंघ या तीन मतदार संघांची मतमोजणी नवीमुंबईत नेरुळ इथं होत असून मतपत्रिकांची प्राथमिक मोजणी पूर्ण झाली आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणीही आज होत आहे. जळगाव जिल्ह्यातल्या चोपडा इथं मतमोजणी सुरू असताना एका मतदान केंद्रावर तीन मतपत्रिका जास्त निघाल्यानं गोंधळ उडाला. त्यामुळे संबंधित केंद्रावरची मतमोजणी स्थगित झाली आहे.

June 25, 2024 3:08 PM

विधान परिषदेच्या रिक्त होणाऱ्या ११ जागांसाठी आजपासून अर्ज भरायला सुरुवात

विधान परिषदेच्या रिक्त होणाऱ्या ११ जागांसाठी आजपासून अर्ज भरायला सुरुवात झाली. या निवडणुकीसाठी २ जुलै रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज सादर करता येतील ३ जुलै रोजी अर्जांची छाननी होईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत ५ जुलै पर्यंत आहे.   १२ जुलै रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळात मतदान होईल. मनीषा कायंदे, विजय गिरकर, अब्दुल्ला दुर्राणी, निलय नाईक, अनिल परब, रमेश पाटील, रामराव पाटील, वजाहत मिर्झा, प्रज्ञा सातव, महादेव जानकर आणि जयंत पाटील यांचा कार्यकाळ संपत असल्यानं ही निवडणूक होत आहे.