July 12, 2024 2:47 PM

आसाममधल्या पूर परिस्थितीमध्ये काहीशी सुधारणा

आसाममधल्या पूर परिस्थितीमध्ये काही अंशी सुधारणा झाली आहे. मात्र राज्यातल्या २६ जिल्ह्यांमधल्या अडीच हजार गावांत अजूनही पूरस्थिती कायम आहे. आतापर्यंत या पुरामुळे राज्यातली ३९ हजार हेक्टरवरली पिकं नष्ट झाली आहेत.  राज्यातल्या ब्रह्मपुत्रा, बुढीदिहिंग, दिसांग आणि कुशियारा या नद्यांनी पूररेषेची पातळी ओलांडली आहे. दरम्यान, राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

July 5, 2024 11:39 AM

आसाममध्ये पूरस्थिती गंभीर

आसाममध्ये पावसाची संततधार सुरू आहे, त्यामुळे तिथली पूरस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. राज्यातल्या 29 जिल्ह्यांतील 21 लाखांहून अधिक लोकांना पूराचा फटका बसला आहे. राज्यपाल गुलाबचंद कटारिया यांनी पूरग्रस्त मोरीगाव जिल्ह्याला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आणि पुरग्रस्तांच्या आवश्यक त्या गरजा पूर्ण करण्यासाठी योग्य व्यवस्थापन करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले. आसामचे मुख्यमंत्री हेमंता बिस्वा सरमा यांनीही माजुली, ढेमजी आणि लखीमपुर जिल्ह्यातील पूरपरिस्थितीचा आढावा घेतला.  

July 3, 2024 10:01 AM

आसाममध्ये पूरस्थिती गंभीर, ३८ नागरिकांचा मृत्यू

आसाममध्ये पूरस्थिती आणखी गंभीर झाली आहे. २८ जिल्ह्यांतील ११ लाखांहून अधिक लोकांना पुराचा फटका बसला असून पुरामुळे मृतांची संख्या ३८ वर पोहोचली आहे. राज्यातील ८४ महसुली मंडळातील २ हजार २०८ गावांचं पुरामुळे मोठं नुकसान झालं असून ४२ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचंही नुकसान झालं आहे. ब्रह्मपुत्र, बराक आणि त्यांच्या सर्व उपनद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. पुरामुळे ७४ रस्ते, १४ बंधारे आणि ६ पुलांचे नुकसान झालं आहे. राज्य सरकारनं १४० मदत शिबिरं आणि ३५९ पुनर्वसन केंद्र उघडली आहेत.

June 16, 2024 8:37 PM

चीनमधल्या ग्वांगशी झुआंग स्वायत्त प्रदेशातल्या २२ नद्यांना पूर

जोरदार पावसामुळे चीनमधल्या ग्वांगशी झुआंग या स्वायत्त प्रदेशातल्या २२ नद्यांना पूर आला आहे. पुराने धोक्याची पातळी ओलांडल्याचं ग्वांगशी झुआंगमधल्या ३० जलविज्ञान केंद्रांनी म्हटलं आहे. तर फुजिआन प्रांतात दरड कोसळल्यानं वाहतूक व्यवस्था विस्कळित झाली आहे. चीनमधल्या अनेक भागात मोठ्या प्रमाणात पूर येण्याचा इशारा चीन सरकारने नागरिकांना दिला आहे.