September 15, 2024 7:54 PM

छत्तीसगडमधे चेटूक करत असल्याच्या संशयावरुन एकाच कुटुंबातल्या ५ जणांची हत्या

छत्तीसगडमधे सुकमा जिल्ह्यात चेटूक करत असल्याच्या संशयावरुन एकाच कुटुंबातल्या पाच जणांची आज हत्या करण्यात आली. त्यात तीन महिलांचा समावेश आहे. कोंटा पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या ईटकला गावात हा प्रकार घडल्याचं समजल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांसह पोलीस पथक घटनास्थळी पोचलं. याप्रकरणी त्यांनी पाच जणांना अटक केली आहे. अधिक तपास सुरु असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

September 3, 2024 8:05 PM

छत्तीसगडमधे सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ९ माओवादी ठार

छत्तीसगडमधे, आज सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ९ माओवादी मारले गेले. बस्तर विभागातल्या दंतेवाडा आणि बिजापूर जिल्ह्यांच्या सीमेवर ही चकमक उडाली. या भागात मोठ्या संख्येनं माओवादी असल्याची माहिती सुरक्षादलांना मिळाली होती. त्यानुसार केंद्रीय राखीव पोलीस दल आणि जिल्हा राखीव सुरक्षारक्षकांचं संयुक्त पथक एंद्री गावाजवळ त्या भागात पाठवलं. त्यांची शोधमोहिम सुरु असताना माओवाद्यांशी त्यांची चकमक उडाली. चकमकीनंतर ९ माओवाद्यांचे मृतदेह तसंच काही शस्त्रास्त्र सापडली. शोधमोहिम अजूनही सुरु आहे.

July 18, 2024 3:10 PM

छत्तीसगडमधे नक्षलविरोधी मोहिमेत २ जवान शहीद

छत्तीसगडमध्ये विजापूर आणि सुकमा जिल्ह्याच्या सीमेजवळ काल रात्री माओवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात पोलिसांच्या विशेष कार्यदलाचे दोन जवान शहीद झाले. या परिसरात माओवाद्यांविरोधात शोध मोहीम सुरु होती. त्यावेळी माओवाद्यांनी आई.ई.डी.चा स्फोट केला. या हल्ल्यात जखमी झालेल्या चार जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.  

July 3, 2024 1:46 PM

छत्तीसगढमध्ये सुरक्षादलांशी झालेल्या चकमकीत पाच माओवादी ठार

छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांशी काल झालेल्या चकमकीत नारायणपूर जिल्ह्यात पाच माओवादी ठार झाले. महाराष्ट्राच्या सीमेलगत असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांवर माओवाद्यांनी हल्ला करत बेछूट गोळीबार केला. सुरक्षा दलांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात पाच माओवादी ठार झाले. दरम्यान, सुरक्षा दलांनी राज्यातल्या सुकमा जिल्ह्यातल्या विविध भागातून नऊ माओवाद्यांना अटक केली, तर सुकमा जिल्ह्यात एका महिलेसह दोन माओवाद्यांनी शरणागती पत्करली आहे.