August 8, 2024 1:28 PM

विमान कंपन्यांना इराण आणि लेबनॉनची हवाई हद्द टाळण्याच्या सूचना

ब्रिटन आणि इजिप्तनं आपल्या विमान कंपन्यांना इराण आणि लेबनॉनची  हवाई हद्द टाळण्याच्या सूचना दिल्या आहेत. हमासच्या प्रमुखाची अलीकडेच हत्या झाल्याच्या पार्श्वभूमीवर या भागात तणाव वाढला आहे. अनेक देशांनी इस्रायल आणि लेबनॉनला जाणाऱ्या विमानसेवा रद्द केल्या असून इतर उड्डाणांसाठी इराण आणि लेबनॉनची हवाई हद्द वापरू नये, असं सांगितलं आहे.   दरम्यान, हमासचा प्रमुख इस्माईल हानिया याच्या हत्येचा सौदी अरेबियाने निषेध केला आहे. ही हत्या इराणच्या सार्वभौमत्वाचं उल्लंघन असल्याचं सौदी अरेबिया सरकारने म्हटलं आहे.

July 6, 2024 1:08 PM

ब्रिटनच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये २९ भारतीय वंशाचे संसद सदस्य

  ब्रिटनचे नवे प्रधानमंत्री कीर स्टार्मर यांनी भारतीय वंशाच्या ब्रिटीश खासदार लिसा नंदी यांची संस्कृती, माध्यम आणि क्रीडा या विषयांसाठीच्या परराष्ट्र मंत्री म्हणून नियुक्ती केली आहे. लिसा या उत्तर-पश्चिम इंग्लंडमधील विगनमधून प्रचंड बहुमताने पुन्हा निवडून आल्या आहेत. लिसा या कोलकात्याचे शिक्षण तज्ञ दिपक नंदी यांच्या कन्या आहेत. ब्रिटनच्या सार्वत्रिक निवडणुकीत हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सुमारे २९ भारतीय वंशाचे संसद सदस्य विक्रमी संख्येने निवडून आले आहेत.  

July 5, 2024 1:51 PM

ब्रिटनमध्ये संसदीय निवडणुकीत  मजूर पक्षाला निर्णायक बहुमत 

  ब्रिटनमध्ये संसदीय निवडणुकीत निर्णायक बहुमत मिळावून मजूर पक्ष दमदार विजयाकडे वाटचाल करत आहे. मतमोजणी अद्याप संपलेली नाही  तरीही आतापर्यंत ६५० पैकी ३२६ जागा मजूर पक्षाने  जिंकल्या आहेत.  जवळपास दशकानंतर मजूर पक्षाला जनादेश मिळाला आहे. जनतेने बदल घडवण्याच्या उद्देशाने मतदान केलं आहे असं मजूर पक्षाचे नेते कीयर स्टार्मर यांनी  म्हटलं आहे. दरम्यान मावळते प्रधानमंत्री आणि हुजूर पक्षाचे नेते ऋषी सुनक यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारली आहे.