September 24, 2024 8:27 PM

ज्ञानराधा बहुराज्य सहकारी पतसंस्था घोटाळाप्रकरणी ईडीची कारवाई

ज्ञानराधा बहुराज्य सहकारी पतसंस्था घोटाळाप्रकरणी ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं आज ८५ कोटी ८८ लाख रुपये किंमतीच्या स्थावर मालमत्तांवर टाच आणली. मुंबई, पुणे औरंगाबाद आणि बीड जिल्ह्यातल्या निवासी सदनिका, व्यावसायिक कार्यालयांच्या जागा, आणि भूखंडाचा त्यात समावेश आहे. आतापर्यंत याप्रकरणी ९५ कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या मालमत्तांवर जप्ती किंवा टाच आणली आहे. 

August 30, 2024 10:49 AM

अमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाचे देशभरात दहा ठिकाणी छापे

सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीनं आखाती देशांतून कार्यरत असलेल्या आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तस्कर जसमीत हकीमजादा प्रकरणी काल देशभरात दिल्ली, अमृतसर, जालंधर, मुंबई, सोलापूर आणि इंदूर अशा दहा ठिकाणी छापे टाकले. अमेरिकेच्या फॉरेन नार्कोटिक्स किंगपिन डेजिगेशन अॅक्टअंतर्गत 'महत्त्वपूर्ण परदेशी अंमली पदार्थ तस्कर' म्हणूनही त्याची नोंद आहे. पी एम एल ए कायद्यातील तरतुदींनुसार ही कारवाई करण्यात आली. दुबईत राहणारा जसमीत भारतात अंमली पदार्थांचा व्यापार चालवत असल्याचं ईडीच्या तपासात निष्पन्न झालं आहे.

July 1, 2024 6:08 PM

केंद्र सरकार ईडी आणि सीबीआयचा गैरवापर करत असल्याचा विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीचा आरोप

केंद्र सरकार ईडी आणि सीबीआयचा गैरवापर करत असल्याचा आरोप करत विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीने आज संसदेच्या आवारात निदर्शनं केली. विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि इतर ज्येष्ठ नेते या निदर्शनांमध्ये सहभागी झाले होते. आम आदमी पक्षाच्या नेत्यांची तुरुंगातून सुटका करावी अशी मागणीही यावेळी विरोधकांनी केली.